
प्रतिनिधी :मिलन शहा
जैन समाजाला विश्वासात घेऊन त्याच ठिकाणी मंदिर पुनर्बांधण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे खासदार वर्षा गायकवाड यांना आश्वासन.
बुलडोझर सरकारच्या विरोधात जैन समाजाचा विलेपार्ल्यात विराट मोर्चा, मोर्चात खा. वर्षा गायकवाड सहभागी.
मुंबई, दि. 19 एप्रिल
विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पहाता बीएमसी अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि आदरणीय ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट असून भाजपा युतीचे ‘बुलडोझर सरकार’च त्यास जबाबदार आहे असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
जैन मंदिराच्या पाडकामाविरुद्ध संपूर्ण जैन समुदायाने मोठा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी होऊन खासदार वर्षा गायकवाड यांनी जैन समुदायाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारला.
याविषयी माहिती देताना खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, जैन मंदिर पाडल्याप्रकरणी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्याच जागी पुन्हा दिगंबर जैन मंदिर बांधून देण्याची ग्वाही दिली आहे. तत्पूर्वी सकाळी आम्ही या पवित्र स्थळाला भेट दिली आणि मंदिराच्या व्यवस्थापन समितीसह जैन समुदायाच्या पीडित सदस्यांना भेटलो. मंदिर समितीच्या म्हणण्यानुसार, एका हॉटेल मालकाला या ठिकाणी बार उघडायचा आहे आणि त्यासाठी हा बुलडोझर चालवण्यात आला, असेही खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.