प्रतिनिधी :मिलन शहा
खासदाराला पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर गृहमंत्र्यांनी माफी मागावी, दोषी पोलिसांवर कारवाई करा.
सोनिया गांधी व राहुल गांधींवरील ईडी कारवाई राजकीय, राहुल गांधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न.
पोलिसांच्या धक्काबुक्कीत खा. वर्षा गायकवाड व काँग्रेस कार्यकर्ते जखमी, अमानवी पद्धतीने ताब्यात घेतले.
मुंबई, दि. 16 एप्रिल
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, अमानवी पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना दुखापत झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी माफी मागावी व संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
राज्य सरकार व मुंबई पोलिसांच्या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस हा लोकशाही जपणारा आणि जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने झगडणारा एकमेव पक्ष आहे. राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेची भाजपा व नरेंद्र मोदी यांना भिती वाटत आहे म्हणूनच खोटे खटले आणि बनावट आरोप लावून आवाज दडपला जात आहे. काँग्रेस अत्याचारी इंग्रजांपुढे झुकली नाही तर मोदी-शहांच्या नवीन ईस्ट इंडिया कंपनीपुढे कशी झुकेल. भाजपाच्या दडपशाही आणि अन्यायाविरुद्ध आम्ही लढत राहू. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना भिक घालत नाही, असेही खासदार गायकवाड म्हणाल्या.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपच्या ED ने खोटे आरोपपत्र दाखल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना किती घाबरतात हेच दाखवून दिले आहे. पण राहुल गांधी व काँग्रेस पक्ष भाजपाच्या अशा कारवायांना घाबरत नाही. मोदींच्या तानाशाहीविरोधात काँग्रेसचा संघर्ष यापुढेही सुरुच राहिल, असा निर्धारही खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
या आंदोलनात प्राणिल नायर, डॉ. अजंता यादव, संदिप शुक्ला, सुरेशचंद्र राजहंस, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, निजामुद्दीन राईन, ताज मोहम्मद, रमेश कांबळे, अवनिश सिंग, उमर लाकडावाला, हुकूमराज मेहता, रविकांत बावकर, क्लाइव्ह डायस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.