
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण संपवण्याचा मनुवादी भाजपा सरकारचा घाट.
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने सरकारी पदांची नोकर भरती कंत्राटीपद्धतीने करण्याचा शासन आदेश काढला आहे. अशा पद्धतीच्या सरकारी नोकर भरती करण्यास तरुणांचा मोठा विरोध आहे. कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती केल्यास आरक्षणाचा हक्क संपतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याचा राज्यातील मनुवादी भाजपा सरकारचा हा कुटील डाव आहे, असा आरोप आरक्षण वर्गीकरण आंदोलनाचे नेते व प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.
मागास वर्गाला जगण्याचा हक्क व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. आरक्षणामुळे या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष हे आरक्षण विरोधी आहेत, सातत्याने ते आरक्षणाची समिक्षा करण्याची तसेच आरक्षणाची गरज नसल्याची भाषा करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानही भाजपा मानत नाही, त्यामुळे आरक्षण संपवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राज्यातील शिंदे सरकारने सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलांवर अन्याय करणारा आहे. कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीतून कंत्राटदारांचेच खिसे गरम होणार आहेत आणि नोकरी करणाऱ्यांला तुटपुंजे मानधन मिळणार आहे.
पगारावरच जास्त खर्च होत असून एका सरकारी नोकराच्या पगारातून चार-चार जणांचे खाजगी क्षेत्रातील पगार होतात हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान आक्षेपार्ह व सरकारी नोकरदारांचा अपमान करणारे आहे. सरकारी पगाराचा हिशोब मांडणाऱ्या अजित पवारांनी सरकारचा वायफळ व अनावश्यक खर्च बंद करावा. कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती करण्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. सरकारने हा निर्णय ताबडतोब रद्द करावी अशी समाजातील सर्व स्तरातून मागणी होत आहे. भाजपा सरकारची ही कृती मागास समाजासह सर्व समाजाला जाचक ठरणारी आहे. आरक्षणावर घाला घालण्याचा भाजपा व आरएसएसचा हा कुटील डाव वेळीच ओळवावा, असे आवाहनही सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.