
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानक दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत, पावसाळापूर्व उपाययोजनांचा भाग म्हणून, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपनगरीय लोहमार्गावर रुळाखालील नाल्यांच्या प्रवाहामधून गाळ काढणे, लोहमार्गाची स्वच्छता करणे ही कामे वेगाने केली जात आहेत. या कामांची महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) सुरेश पाखारे यांनी दिनांक 22 मे रोजी सकाळी रेल्वेच्या विशेष बोगीतून प्रवास करीत संयुक्त पाहणी केली.
मुंबई महानगरात पावसाळापूर्व उपाययोजनांसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्ये नाल्यांमधील गाळ काढण्यासह नाल्यांचे रुंदीकरण, रेल्वे रुळाखालील व इतर ठिकाणी देखील बंदिस्त मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करणे, ही कामे देखील समाविष्ट असतात. यंदादेखील महानगरपालिकेने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन समवेत मिळून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्टची स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. या कामांना वेग देण्यासह विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावणे, आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करणे ही कामे मे अखेरीस पूर्ण होतील, अशारितीने केली जात आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर आज ही पाहणी करण्यात आली. रेल्वे रूळखालील कल्वर्ट आणि रेल्वे रुळांवर झालेली चांगली स्वच्छता पाहून पथकाने समाधान व्यक्त केले.
या पाहणीवेळी महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पर्जन्य जल वाहिन्या) अशोक मिस्त्री, पर्जन्य जल वाहिन्या विभागाचे उपप्रमुख अभियंता (प्रचालन व परिरक्षण) प्रशांत तायशेटे, उपप्रमुख अभियंता (पूर्व उपनगरे) विभास आचरेकर, रेल्वेचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक (प्रशासन) सुमंत देवलकर, वरिष्ठ विभागीय अभियंता अर्पण कुमार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते अशी माहिती पालिकेने प्रसिद्धी पत्रक द्वारे दिली आहे.