प्रतिनिधी :मिलन शहा
परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानावर तीव्र आंदोलन.
मुंबई: दि. 3 मार्च
परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर संतप्त जनतेने तीव्र निषेध केला होता, या वेळी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून लोकांना बेदम मारहाण केली, अनेकांना बेकायदेशीर अटक केली, यात सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी अद्याप पोलिसांवर कठोर कारवाई केलेली नाही. सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू ही हत्या असून संबंधित पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी संपूर्ण प्रकरणाची चौकशी हाय कोर्टाच्या न्यायाधिशांकडून करावी तसेच सरकारने सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केल्या आहेत.
परभणी प्रकरणी आझाद मैदानात हजारो आंबेडकरी जनतेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले, या आंदोलन खासदार वर्षा गायकवाड यांनीही सहभाग घेतला होता. यावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, परभणी प्रकरण सरकारने जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला तरीही सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही, पण सरकारला आम्ही स्वस्थ बसू देणार नाही. सोमनाथ सुर्यंवंशी व विजय वाकोडे यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहणार आहे, असे खासदार गायकवाड म्हणाल्या.
पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत जखमी झालेल्या भीमसैनिकांना आर्थिक मदत द्यावी. आंबेडकरी जनतेवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावे, सुर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर हत्येचे गुन्हे दाखल करावेत, फास्टट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालवावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्य़ा आहेत. यावेळी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, मोर्चाचे आयोजक आणि अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्राचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मुंबई महासचिव महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, रमेश कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.