
प्रतिनिधी:मिलन शाह
नवनीत राणांवर कारवाई करण्यास गृहखात्याची चालढकल
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लव्ह जिहादच्या नावावर पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घालत पोलीसांशी हुज्जत घातली. नवनीत राणा यांचा हा आक्रस्ताळेपणा याआधीही दिसून आला आहे. सरकारी अधिकाऱ्यांशी वाद घालणे, दमदाटी करणे हे नित्याचेच झाले असून खा. नवनीत राणा यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी काँग्रेस नेते, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.
खासदार नवीनत राणा यांनी लव्ह जिहादचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये जो वाद घातला तो लोकप्रतिनिधीला शोभा देणारा नाही. पोलीसांच्या कामात हा थेट हस्तक्षेप आहे. पती-पत्नी राणा हे नेहमीच सरकारी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत असतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अमरावतीत झालेल्या प्रकारानंतर पोलीस विभाग व पोलीसांच्या कुटुंबियांतून तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली जात आहे. सरकारने विशेषतः गृहविभागाने याची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कारावाई करणे अपेक्षित आहे पण गृहखाते राणा पती पत्नीला पाठीशी घालत असल्याचे दिसते. राणा पती-पत्नीला पाठीशी कोण घालत आहे? कारवाई करण्यात चालढकल का केली जात आहे? याची उत्तरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजेत.
राणा पती-पत्नी हे अमरावती व राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. आधी हनुमान चाळीसाच्या नावावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केले. नुपूर शर्मा प्रकरणातही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आता पुन्हा एकदा लव्ह जिहादचा वाद घातला. या प्रकरणात स्वतः त्या मुलीनेच खुलासा केल्याने नवनीत राणा यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्ट झाले. तर आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्तांवरही आरोप करत त्यांची बदली झाल्याचे जाहीर करून टाकले. गृहमंत्री राणा आहेत का फडणवीस, हा प्रश्न लोकांना पडला आहे. राणा पती-पत्नीच्या या अरेरावीला चाप लावणे गरजेचे असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी राजहंस यांनी केली.