
प्रतिनिधी:मिलन शाह
मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल : खासदार विनायक राऊत
मुंबई,मागासवर्गीय समाजाच्या विविध योजनांना शिंदे- फडणवीस सरकारने स्थगिती देऊन समाजावर अन्याय केला आहे. ही स्थगिती तात्काळ उठवावी अन्यथा मागासवर्गीय समाजाच्या मुळावर उठलेल्या या स्थगिती सरकारला मागासवर्गींय समाजाने आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धडा शिकवावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंती निमित्त सांताक्रुझ वाकोला येथे मातंग समाजाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी राजहंस बोलत होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे शिवसेना खासदार विनायक राऊत, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, धनंजय कांबळे, अरुण कुचेकर, संतोष कांबळे, अतिष वाघमारे, लहू थोरात, तानाजी सूर्यवंशी, कृष्णा गाडे आदी उपस्थित होते.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी शिवसेना राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करेल, वेळप्रसंगी मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही करेल असे खासदार विनायक राऊत म्हणाले.
या मेळाव्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक व इतर अनेक विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे भांडवल महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1000 कोटी रुपये एवढे करण्यात आले होते, परंतु शिंदे फडणवीस सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली त्याबद्दल मातंग समाजामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शिंदे फडणवीस सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या अनेक योजना ज्या मागील सरकारच्या काळात घेण्यात आल्या होत्या त्या सर्व योजनेला स्थगिती देण्यात आली आहे त्याचा निषेध या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.