मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणार ‘सर्वांसाठी पाणी !’ धोरणाचा शुभारंभ.

Share

प्रतिनिधी:मिलन शाह

माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, ‘गोरेगांव पूर्व’ येथे 7 मे रोजी शुभारंभ

नवीन पाणी धोरणांतर्गत विविध प्रवर्गातील झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार नळजोडणी

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज तब्बल ३८५ कोटी लीटर म्हणजेच ३ हजार ८५० दशलक्ष लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करते. हा पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत सध्या 4 लाख 60 हजार अधिकृत नळजोडण्या आहेत. मात्र, असे असले तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही प्रचलित व पूर्वीच्या नियमांमुळे विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये राहणा-या रहिवाशांना नळजोडणी देता येत नसे. त्यामुळे अशा परिसरात राहणा-या नागरिकांना आणि विशेष करुन महिला वर्गाला विविध अडचणींना सामोरे जावे लागत असे. ही बाब लक्षात घेऊन व मानवीय भूमिकेतून विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये व निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी !’ या धोरणाचा शुभारंभ शनिवार, दिनांक 7 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
‘गोरेगांव पूर्व’ परिसरातील नागरी निवारा परिषदेच्या जवळ असणा-या ‘माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान’ या ठिकाणी शनिवारी सायंकाळी 6 वाजता होणा-या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळा साहेब थोरात, उद्योग – खनिकर्म – मराठी भाषा विभागांचे मा. मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास व सार्वजनिक बांधकाम या खात्यांचे मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य खात्यांचे मंत्री ऍड. अनिल परब, वस्त्रोद्योग – मत्स्यव्यवसाय – बंदरे या खात्यांचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन – पर्यावरण – राजशिष्टाचार या खात्यांचे मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
..
तसेच या कार्यक्रमाला मा. स्थानिक खासदार श्री. गजानन कीर्तीकर, मा. स्थानिक आमदार श्री. सुनिल प्रभू, मा. आमदार श्री. सुनिल शिंदे, मा. आमदार श्री. राजहंस सिंह हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *