प्रतिनिधी :मिलन शहा
गृहखात्यांचा कारभार अत्यंत सुमार दर्जाचा, देवेंद्र फडणवीसांनी सक्षम व्यक्तीकडे गृहमंत्रीपद द्यावे.
महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी केलेल्या शक्ती कायद्याला केंद्र सरकार मान्यता का देत नाही?
मुंबई, दि.. 26 फेब्रुवारी
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना होते ही पुण्यासह महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी घटना आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात महिला बलात्कारची घटना घडणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीवर कठोर कारवाई केलीच पाहिजे पण राज्यात गृहविभागाचा कारभार अत्यंत सुमार आहे, गृहमंत्री म्हणून फडणवीस या विभागाला न्याय देऊ शकत नाहीत, त्यांनी गृहमंत्रीपद सोडावे, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे. महिला सुरक्षा हा चिंतेचा विषय बनला आहे. पुणे, मुंबई ही शहरे महिलांसाठी सुरक्षित मानली जात असत पण मागील काही वर्षात या दोन्ही शहरात गुन्हेगारी प्रचंड वाढलेली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर ही ओळख कधीच पुसली गेली असून पुणे आता ड्रग्जचे हब, गुन्हेगारी टोळ्यांचे शहर अशी ओळख निर्माण झाली आहे. पहाटे पाच-सहा वाजता शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार होतो हे एसटी महामंडळ, स्वारगेट स्थानक व पुणे पोलीसांच्या बेफिकीर कारभाराचे उदाहरण आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यात एका तरुणीवर बलात्कार होतो हे आपल्याला लाज वाटावी अशी घटना आहे.
महाविकास आघाडी सरकारने महिलांसाठी शक्ती कायदा बनवून केंद्र सरकारडे पाठवला पण अजून त्या कायद्याला मान्यता देण्यात आलेली नाही. महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्याच्यावर चर्चा होते पण महिलांवरील अत्याचार कमी करण्यावर भर दिला जात नाही. भाजपा सरकारच्या काळात तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आले त्यांनी लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारीही घेतली पाहिजे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.