महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातसंविधान समता दिंडीची नोंद होईलशरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास.

Share

प्रतिनिधी :

बारामती,संविधान समता दिंडींच्या माध्यमातून समाजातील द्वेष दूर करून प्रेमाचा संदेश दिला जात आहे. शामसुंदर महाराज सोन्नर आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे लोक हे काम नेटाने करीत आहेत, याची नोंद महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला घ्यावी लागेल, विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात एक दिवस तरी वारी अनुभवावी आणि संविधान समता दिंडीचे आयोजन आज बारामती जवळील पिंपळी येथे आयोजित केला होता. या उपक्रमात शरद पवार, प्रतिभाताई पवार, खासदार सुप्रिया सुळे, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव, योगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
गेली अकरा वर्ष सातत्याने ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी ‘ या उपक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद कदम यांनी केले.एक दिवस तरी वारीची सुरुवात कशी झाली. संतांनी सांगितलेला समतेचा विचार हा या वारीची प्रेरणा असल्याचे सांगत 11 वर्ष ही वारी कोणत्या संघर्षातून वाटचाल करीत इथ पर्यंत आली त्याचे विवेचन त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत केले.

दुपारच्या विसाव्याच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, पंढरीची वारी म्हणजे सामाजिक समतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कोण कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या वंशाचा याचा विचार इथे कधीही नसतो. आनंद हा आहे की अलीकडच्या काळामध्ये समाजातील सुशिक्षित लोक, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक हे सुद्धा वारीमध्ये सहभागी होऊन हा विचार समजून घेत आहेत. संतांचा हा विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. तो इतर प्रांतातही रुजला आहे. नामदेव महाराज उत्तर हिंदुस्थानामध्ये गेले. ते काही वर्षे पंजाबमध्ये राहिले. समतेचा विचार मांडला. आज नामदेवांची अतिशय उत्तम मंदिरं पंजाबमध्ये आहेत. त्या मंदिरांतून अखंडपणाने नामदेवांचे विचार मांडण्यासंबंधीची व्यवस्था केली जाते. शिखांचा धर्म वेगळा आहे पण त्यांच्या धर्मग्रंथामध्ये नामदेव महाराजांचे अभंग आहेत
माणसांवर उत्तम प्रकारचे संस्कार अखंडपणाने करण्याचे काम संतांनी केले. हा भारताचा सगळ्यात मोठा ठेवा आहे. मला आनंद आहे की तो ठेवा एक दिवस तरी वारी अनुभवावी आणि संविधान समता दिंडीच्या माध्यमातून जतन केला जात आहे, असेही पवार म्हणाले.
आनंदी समाज घडविण्याची
शामसुंदर महाराज यांची धडपड

या ठिकाणी आजचा हा एक वेगळ्या प्रकारचा सोहळा आहे. शामसुंदर महाराजांनी संत विचारांच्या आधारे जनमाणूस कसा घडवता येईल? विधायक प्रवृत्तीला प्रोत्साहन कसे देता येईल? आणि प्रागतीक विचार लोकांमध्ये कसा सखोल जाईल? त्यातून आनंदी समाज निर्माण होईल, अशी शामसुदंर महाराज यांची धडपड आहे. त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे. आपला पत्रकारितेचा पेशा सोडला, हे काम खूप महत्वाचे आहे, त्यांच्या या कामाला सहकार्य करण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत, ही खूप महत्वाची बाब आहे, असेही पवार म्हणाले.
परदेशी लोकही वारीत
रशियामध्ये भेटलेल्या एका परदेशी वालकरी महिलेचा किस्साही यावेळी शरद पवार यांनी सांगितला. ते म्हणाले की, मी केंद्र सरकारमध्ये मंत्री असताना रशियाला गेलो होतो. तिथल्या राजदूतांनी काही लोकांना संध्याकाळी माझ्याबरोबर विचार विनिमय करायला बोलावलं. तिथली एक रशियन बाई माझ्याशी मराठीत बोलली, मला गंमत वाटली. त्या राजदूतांना मला सांगितलं त्या नुसत्या मराठीत बोलत नाहीत तर वर्षातून एकदा पंढरीची वारी करतात. पंढरीची वारी करायला एक रशियन बाई जाते, त्या बाईचं मला कौतुक वाटलं. पुढच्या वारीच्या वेळेला त्या आल्या. मी त्यांना माझ्या घरी बोलावलं. मध्यम वर्गातील काही भगिनींना देखील मी बोलावलं. त्यांची आणि या रशियन वारकरी बाईंची ओळख होत गेली. मी त्या सगळ्यांना सांगितलं ही भगिनी वारीला जाते. मध्यमवर्गीय भगिनींपैकी एकीने विचारलं तुम्ही वारीला कुठून जाता? पुण्यातून जाता की सासवड मधून जाता? की आणखी कुठून जाता? त्या रशियन बाईंने मोठ्या गमतीचे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, वारी ही सासवडपासून, बारामतीपासून निघत नाही. देहूमध्ये तुकोबांचे दर्शन घेऊन शेवटी पंढरीला पोहोचते त्याला वारी म्हणतात. याचा अर्थ हा विचार जगाच्या पातळीवर पोहोचण्याच्या संबंधीचे काम अनेक संतांनी केलं आणि त्याची नोंद जगातल्या अनेक देशांमध्ये घेतली गेली आहे, असेही पवार म्हणाले.
महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी म्हणाले आजचा हा अनुभव माझ्या आयुष्यातील वेगळी घटना आहे. त्यात मला सहभागी होता आले आणि या वारकऱ्यांचे दर्शन घेता आले.खासदार सुप्रिया सुळे, वर्षा देशपांडे,हभप बापूसाहेब महाराज देहुकर,
आज सकाळी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांनी बारामती एस. टी.स्टँड पासून या वारीत चालायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर माऊली,तुकाराम महाराजांच्या जय घोषात हभप सोमनाथ महाराज पाटील यांच्या दिंडी क्रमांक 261 मध्ये ही मंडळी चालत होती.महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गाँधी, मार्मिकचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे,पत्रकार रवींद्र पोखरकर,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष माधव बावगे,हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर,तुकडोजी महाराज मठाचे सुबोध दादा,लेक लाडकी अभियानाची ॲड. वर्षा देशपांडे,सामाजिक कार्यकर्ते संतोष देशपांडे,इरफान इंजिनियर,फिरोज मिठीबोरवाला,राजाभाऊ अवसक,प्राचार्य सविता शेट्ये,विदर्भातील माया वाकोडे,नरेंद्र डुंबरे,श्रीकांत लक्ष्मी शंकर,संजय रेंदाळकर, राजवैभव, शितल यशोधरा,जीवराज सावंत,विनायक होगाडे,सदाशिव मगदूम, बाबा नदाफ, हरिदास तम्मेवार,आदी मान्यवरांचा सहभाग होता.
एक दिवस वारी अनुभवावी आणि संविधान समता दिंडीचे आयोजन दत्ता पाकिरे, साधना शिंदे,हभप समाधान महाराज देशमुख,सरस्वती शिंदे,सुमित प्रतिभा संजय,महादेव पाटील,विशाल विमल, ॲड शैला जाधव आदींनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल विमल आणि आभार सरस्वती शिंदे यांनी केले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *