प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई, : भांडुप पश्चिमेकडील अशोक टेकडी, प्रताप नगर या भागात संतोष जाधव या गुंडाने हैदोस घातला आहे. काही कारण नसताना केवळ दहशत निर्माण करण्यासाठी प्रवीण बामणे या तरुणाच्या डोक्यावर चॉपरने वार केला तर प्रिती पंडित या महिलेला स्ट्रम्पने मारहाण केली. परिणामी या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भांडुप पश्चिम भागात अलीकडच्या काळात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. अमली पदार्थांची विक्रीही खुलेआम होत असते. गुरुवारी संतोष जाधव यांने हातात चॉपर घेऊन घराघरात घुसून मारहाण केली. प्रवीण बामणे याच्या डोक्यावर वार केल्यामुळे त्याच्यावर दहा टाके घालावे लागले आहेत. तसेच प्रिती पंडित या महिलेलाही मारहाण केल्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर होण्याबरोबरच तोंडावरही जखम झाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी संतोष जाधव याला अटक केली असली तरी त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल न करता सौम्य कलमे लावली आहेत. जाधव याच्यावर यापूर्वी 16 गुन्हे दाखल असून त्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी वसूल करणे, धमकी देणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यापूर्वी मपोका अंतर्गत त्याला तुरुंगातही डांबले होते. परंतु सुटून आल्यानंतर त्याने पुन्हा दहशत माजविण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे पोलिसांनी एकूणच भांडुप परिसरातील गुंडगिरीचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा स्थानिक जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.