प्रतिनिधी :मिलन शहा
संतोष देशमुख हत्याप्रकरणी भाजपा युती सरकारने नैतिक अधिकार गमावला, लोकविरोधी सरकार बरखास्त करा -खा. वर्षा गायकवाड
मुंबई: बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निघृणपणे ठार करण्यात आल्याचे सातत्याने सांगितले गेले पण सरकार मात्र चौकशी सुरु आहे एवढेच पालुपद लावत होते. या हत्याप्रकरणातील फोटो बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला व हळहळला. माणुकीसाला काळीमा फासणारा प्रकार पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. या प्रकरणी सरकारला शेवटी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला, पण फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, सर्व आरोपींना फाशी द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजपा युती सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चर्चा डिसेंबरपासून चालू आहे, पीडित कुटुंबाने न्याय मिळण्यासाठी जीवाचा आटापिटा केला, विरोधी पक्ष याविरोधात तीव्र आवाज उठवत राहिले मात्र भापजा युती सरकार आरोपींना व त्यांच्या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिले. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशी सुरु आहे कोणालाही सोडणार नाही असेच म्हणत राहिले पण ठोस कारवाई करण्यास चालढकल करत होते. राज्याचे प्रमुख व गृहमंत्री नात्याने फडणवीस यांना पोलीस विभागाने या प्रकरणाची सर्व माहिती दिली असणारच पण त्यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशिर केला. संतोष देशमुखांची एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे पण या प्रकरणी फडणवीस व अजित पवार यांची आतापर्यंतची भूमिका पाहता जनता त्यांना माफ करणार नाही.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपा युती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली होती, त्यांनी आजपर्यंत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. गुंडांना सरकारमधील लोकच पाठीशी घालत असतील तर या सरकारला सत्तेत राहण्याचा काही अधिकार नाही, या सरकारने नैतिक अधिकारच गमावला असून हे लोकविरोधी सरकार बरखास्त करावे, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली आहे.