प्रतिनिधी :मिलन शहा
जिजाऊंच्या राज्यात सावित्रीच्या लेकी असुरक्षित, केंद्रीय मंत्र्यांची मुलगीही सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचे काय ?- खा. वर्षा गायकवाड.
गृहखात्याच्या कारभाराने महाराष्ट्राची नाच्चकी केली, निक्रीय व अपयशी देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
मुंबई:
भाजपा युती सरकारच्या राज्यात माता भगिनींना अजिबात सुरक्षित वाटत नाही. दररोज महिला अत्याचाराचा घटना होत आहेत. पुण्यात शिवशाही बसमध्ये महिला अत्याचाराची घटना ताजी असतानाच जळगावात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची भररस्त्यात छेड काढण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल करूनही त्यावर कारवाई होत नसल्याने शेवटी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारावा लागला. हा प्रकार लाजिरवाणा आणि चिंताजनक आहे.
जिजाऊंच्या राज्यात सावित्रीच्या लेकीच असुरक्षित असून केंद्रीय मंत्र्यांची मुलगीही सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य महिलांचे का? असा संतप्त सवाल करून निक्रीय व अपयशी देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
महिला अत्याचाराप्रश्नी भाजपा युती सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आज शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, बस,रेल्वे स्थानके, यात्रा, पर्यटनस्थळे, महिला कुठेही सुरक्षित नाहीत. आमच्या माता-भगिनी भीतीच्या छायेखाली जगत आहेत. त्यांना असुरक्षित वाटणे हीच भाजपा सरकारच्या अकार्यक्षमतेची साक्ष आहे. महिलांचा आदर, सन्मान आणि सुरक्षा ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. पण त्यात भाजपा युती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ व त्यानंतर शिंदे सरकारमध्ये व आजही गृहमंत्रीपदी आहेत. पण त्यांच्या काळात पोलीस विभागात प्रचंड राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. भाजपा आमदार, खासदार मंत्रीच पोलिसांना उघड उघड धमक्या देतात तर सत्ताधारी गुंडांना आश्रय देतात हे चित्र आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर, मंत्रालयात गुंड बिनधास्त फिरतात. सत्ताधारी पक्षाचे नेते गुंडांच्या घरी जातात. बीडमध्ये तर खंडणी, अपहरण, हत्या करणारे एका मंत्र्यांचे खास मर्जीतले लोक आहेत. भाजपा युती सरकारच्या काळात गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले आहे. गृहखात्याच्या कारभाराने महाराष्ट्राची नाच्चकी झाली आहे पण फडणवीस यांना जनाची आणि मनाचीही लाज वाटत नाही.
आज राज्याच्या मुख्य सचिव महिला, पोलीस महासंचालक महिला आहेत, मंत्री महिला आहेत आणि तरीही महिला सुरक्षित नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व देवेंद्र फडणवीसांचे पोलीस दल फक्त विरोधकांवर कारवाई करण्यात तत्पर आहे.
छेडछाड व बलात्कार यांसारख्या घटनांना पायबंद घालण्यासाठी राज्यात शक्ती कायद्याची अत्यंत गरज आहे. पण केंद्रातील भाजपा सरकार त्याला मान्यता देत नाही. राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थितेला देवेंद्र फडणवीसच जबाबदार असून गृहविभागाचा भार त्यांना पेलवत नाही, त्यांनी गृहखात्याला स्वतंत्र व सक्षम मंत्री द्यावा असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.